पार्थ मनमोहन सिंग राजपूत याचा वर्ल्ड रेकॉर्ड; धुळे जिल्ह्याचा गौरवशाली क्षण.!!!

 पार्थ मनमोहन सिंग राजपूत याचा वर्ल्ड रेकॉर्ड; धुळे जिल्ह्याचा गौरवशाली क्षण.!!!


धुळे प्रतिनिधी :-

 धुळे जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व प्रिन्स रोलर स्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी रोजी कमलाबाई कन्या हायस्कूल, धुळे येथे वर्ल्ड रेकॉर्ड कॉम्पिटिशन व एज ग्रुप रोलर स्केटिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेत धुळे जिल्ह्याचा अतिशय कमी वयाचा आणि होतकरू खेळाडू पार्थ मनमोहन सिंग राजपूत याने स्केटिंग मॅरेथॉन प्रकारात 1 तास 26 मिनिटे 26 सेकंद असा विक्रमी वेळ नोंदवत वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आणि प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.


पार्थला या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा मोलाचा पाठिंबा लाभला असून तो वयाच्या अवघ्या तीन वर्षांपासून रोलर स्केटिंगचा नियमित सराव करत आहे. लहान वयातच त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे आज तो आंतरराष्ट्रीय विक्रमाचा मानकरी ठरला आहे.


यापूर्वीही पार्थ मनमोहन सिंग राजपूत याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, अमेरिका बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड रेकॉर्ड बुक या तिन्ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये भारतीय सहभाग नोंदवत इतिहास घडवला आहे. त्यामुळे तो धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्राचा अभिमान ठरला आहे.


या स्पर्धेत 6 ते 8 वयोगटात पार्थला सुवर्णपदक व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्याला हे यश कोच धनंजय पाटील सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्राप्त झाले.


पार्थ मनमोहन सिंग राजपूत हा विजयसिंग रतनसिंग सूर्यवंशी, अध्यक्ष – श्री स्वामी स्वयं सेवाभावी संस्था यांचा नातू असून तो गणेशपूर, तालुका साक्री येथील रहिवासी आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


धुळे जिल्ह्यासाठी हा क्षण अत्यंत गौरवाचा असून भविष्यात पार्थकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या